साई रिसॉर्टप्रकरणात अनिल परब यांची निर्दोष मुक्तता; किरीट सोमय्यांनी प्रतिक्रिया टाळली, पत्रकाराच्या प्रश्नावर गप्प
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार अनिल परब यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात जमीन हडप केल्या आणि शासनाच्या सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता खेड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात मोठा निर्णय देत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे, अनिल परब यांना दिलासा मिळाला असून किरीट सोमय्या यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया दिलीय.
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथे असलेल्या साई रिसॉर्टशी संबंधित प्रकरणात आरोपींवर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा, तसेच खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक असल्याचे निरीक्षण नोंदवत पुराव्यांच्या आधारे सर्व आरोप सिद्ध होत नाहीत, असा निष्कर्ष काढला. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष ठरवत न्यायालयाने त्यांची मुक्तता केली. त्यानंतर, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट प्रकरण बाहेर काढणारे आणि न्यायालयात दावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
विशेष म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आरोपपत्र सादर केले, तेव्हा माजी मंत्री अनिल परब यांचा उल्लेखही त्यात नव्हता. ईडीने आणि विरोधकांनी अनिल परब यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप केला होता. पण, ज्याप्रमाणे आरोप केले जात होते, त्याप्रमाणे तपासात परब यांचा सहभाग आढळला नाही किंवा त्यांच्याविरोधात काही पुरावे सापडले नाहीत का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यातच, आता न्यायालयानेही अनिल परब यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
आमदार अनिल परब यांची रिसॉर्ट प्रकरणी आज पुराव्या आभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली, याबाबत किरीट सोमय्या यांना विचारणा केली असता. सोमय्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता बोलणे टाळले. रायगडमधील कर्जत विधानसभा क्षेत्रात भाजपाच्या खोपोली येथील एसआयआर मार्गदर्शन शिबीरास प्रमुख वक्ते म्हणून सोमय्या यांनी हजेरी लावली होती, याउपस्थितीवेळी पत्रकारांनी त्यांना अनिल परब यांच्या निकालाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला असता सोमय्या यांनी बोलणे टाळले.