७०० रुपयांच्या वादातून मित्राची दगडाने ठेचून हत्या; कल्याणजवळील खडवली नदीकाठी गुन्ह्याचा उलगडा
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण : कल्याणजवळील खडवली नदी परिसरात आढळलेल्या अज्ञात मृतदेहाच्या प्रकरणाचा टिटवाळा पोलिसांनी उलगडा केला असून, केवळ ७०० रुपयांच्या वादातून मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरोपी योगेश कदम याला मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग परिसरातून अटक करण्यात आली आहे.
तीन दिवसांपूर्वी खडवली नदीकाठी एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर सुरुवातीला मोठे आव्हान होते. तपासासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली. ‘बेली’ या श्वानाने घटनास्थळापासून थेट खडवली रेल्वे स्थानकापर्यंतचा माग काढल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.
यानंतर टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, पोलीस अधिकारी नितीन मुदगुन, महेश कदम तसेच ठाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी भाऊसाहेब गायकवाड आणि जयवंत वारे यांच्या पथकाने खडवली ते मुंबईदरम्यान सुमारे ३०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
तपासात मृत व्यक्तीची ओळख राजेश प्रभुळकर अशी पटली. राजेश आणि आरोपी योगेश कदम हे दोघेही जवळचे मित्र असून, एकत्र केटरिंगचे काम करत होते. घटनेच्या दिवशी दोघेही खडवली नदी परिसरात पोहण्यासाठी आणि पार्टीसाठी गेले होते.
पार्टीदरम्यान योगेशला संशय आला की, राजेशने त्याच्या खिशातील ७०० रुपये चोरले आहेत. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापाच्या भरात योगेशने जवळच पडलेला दगड उचलून राजेशच्या डोक्यात वार केले. यात राजेशचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याला मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग परिसरातून ताब्यात घेतले. योगेश कदम हा यापूर्वी मोबाईल चोरीच्या प्रकरणात वाँटेड असून, त्याच्यावर अन्य गंभीर गुन्हेही दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
टिटवाळा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.