मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन; ‘५ कोटी द्या, अन्यथा रेल्वे, आर्मी ऑफिस आणि हॉटेल्स लक्ष्य करू’
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : मुंबई रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी पहाटे धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. ‘इरफान’ नाव सांगणाऱ्या व्यक्तीने पाच कोटी रुपयांची मागणी करत, ती पूर्ण न झाल्यास रेल्वे, आर्मी ऑफिस आणि महत्त्वाच्या हॉटेल्सना लक्ष्य केले जाईल, अशी धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबई रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात हा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव ‘इरफान’ असल्याचे सांगितले. त्याने थेट पाच कोटी रुपयांची मागणी केली.
“पाच कोटी रुपये द्या, अन्यथा सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांशी माझे बोलणे करून द्या. मागणी पूर्ण न झाल्यास रेल्वे सेवा, लष्करी कार्यालये आणि उच्चभ्रू भागातील महत्त्वाची हॉटेल्स लक्ष्य केली जातील,” अशी धमकी त्याने दिल्याचे समजते.
या फोननंतर रेल्वे पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या. फोन नेमका कुठून करण्यात आला, ‘इरफान’ नावाचा व्यक्ती कोण आहे, तसेच या धमकीमागील नेमका हेतू काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेनंतर संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यापूर्वीही विविध शासकीय आणि सुरक्षा यंत्रणांना अशा प्रकारचे धमकीचे फोन आले होते. त्या प्रकरणांमध्ये संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणातही पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.