ठाणेकरांची चिंता वाढली; ३ दिवसांत ६ मुले गायब; पोलिसांच्या विशेष पथकाकडून मुलांचा शोध सुरु

ठाणेकरांची चिंता वाढली; ३ दिवसांत ६ मुले गायब; पोलिसांच्या विशेष पथकाकडून मुलांचा शोध सुरु

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – ठाणे शहरात अल्पवयीन मुले आणि मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या ७२ तासांत शहरातील विविध भागांतून ४ मुली आणि २ मुले अचानक बेपत्ता झाली आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांची विशेष पथके या मुलांचा शोध घेत आहेत.

बेपत्ता झालेल्यांमध्ये मुंब्रा परिसरातील मुलांची संख्या जास्त आहे. संतोषनगर, मुंब्रा येतून २५ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास एक १३ वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर अमृतनगर, मुंब्रा येथून २६ एप्रिल रोजी पहाटे एका १७ वर्षीय मुलीने कोणालाही न सांगता घर सोडले, ती अद्याप घरी परतलेली नाही.

वागळे इस्टेट आणि किसन नगर परिसरातूनही मुले बेपत्ता होण्याचे प्रकार घडले आहेत. किसन नगर २ येथून २५ एप्रिल रोजी सायंकाळी १६ वर्षीय मुलगी “मैत्रिणीकडे जाते” असे सांगून घरून निघाली आणि परतलीच नाही. रुपादेवी पाडा येथे याच दिवशी सायंकाळी १५ वर्षीय मुलगी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. ठाणे पश्चिम २३ एप्रिल रोजी १४ वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. घोडबंदर रोड २३ एप्रिलच्या मध्यरात्री १६ वर्षीय मुलगी घरातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास पोलीस थेट अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. ठाणे पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानके, बस डेपो आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या सोशल मीडिया वापराकडे आणि मित्रमंडळींकडे लक्ष देणे गरजेचे आहे,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मुले बेपत्ता होण्यामागे एखादे रॅकेट सक्रिय आहे का, की मुले घरगुती कारणांमुळे किंवा सोशल मीडियाच्या प्रभावामुळे घर सोडून जात आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon