नितेश राणे दोषी; शांतता भंग प्रकरणात एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा, १ लाख दंड

नितेश राणे दोषी; शांतता भंग प्रकरणात एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा, १ लाख दंड

पोलीस महानगर नेटवर्क 

कणकवली : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांना शांतता भंग प्रकरणात कणकवली न्यायालयाने दोषी ठरवत एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच एक लाख रुपयांचा दंड भरण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे राणे यांना मोठा धक्का बसला असून, निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

हे प्रकरण अभियंते प्रकाश खेडेकर यांच्यावर करण्यात आलेल्या चिखलफेकीशी संबंधित आहे. रस्त्याच्या पाहणीदरम्यान नितेश राणे यांनी खेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. तसेच त्यांना बांधून ठेवणे, कपड्यांना धरून असभ्य वर्तन करणे, अशा प्रकारांचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि राज्यभरात त्यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या प्रकरणात नितेश राणे यांच्याविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने या कलमासह इतर काही गंभीर आरोपांतून त्यांची निर्दोष मुक्तता केली. मात्र भारतीय दंडविधान कलम ५०४ अंतर्गत, म्हणजेच सार्वजनिक शांतता भंग होईल अशा प्रकारे एखाद्याला उद्युक्त करणे, या आरोपात त्यांना दोषी ठरवण्यात आले.

न्यायालयाने या कलमान्वये एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या निकालानंतर राणे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले.

राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने या निकालाची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon