मालवणी पोलिसांकडून १.१५ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त; बोरिवलीच्या २४ वर्षीय तरुणाला बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईच्या मालवणी पोलिसांनी वन्यजीव तस्करांविरुद्ध एक अत्यंत धाडसी आणि मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल १ कोटी १५ लाख ७० हजार रुपये किंमत असलेली व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे.
मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेल्या वस्तूची तस्करी करण्यासाठी एक तरुण मालाड पश्चिम परिसरात येणार होता, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अदनान आसिफ खान (२४) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १.१५७ किलो ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सापडली. आरोपी अदनान हा बोरिवली पूर्व येथील कुलपवाडी, राईटेकडी, शिवशक्ती चाळीत राहणारा आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो.
ही व्हेल माशाची उलटी एकूण १.१५७ किलो ग्रॅम वजनाची होती. या व्हेल माशाच्या उलटीचा सौदा १ कोटी १५ लाख ७० हजार इतका ठरला होता. ही उलटी बेकायदेशीर रित्या विकण्याच्या तो तरुण मालाडला आला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला मुद्देमालासह रंगेहाथ अटक केली. यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
स्पर्म व्हेल’ हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूची १ मध्ये नमूद असलेला अत्यंत संरक्षित प्राणी आहे. या प्राण्याच्या कोणत्याही अवयवांची किंवा उत्पादनांची विक्री करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०७/२०२६ नुसार आरोपीवर खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १३२, ११८ (२), वन्यजीव संरक्षण कायदा १९७२: कलम २, ३९, ४४, ४८ (अ), ४९ (ब), ५७, ५१ या कलमातंर्गत आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.सध्या मालवणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामागे एखादी आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय आहे का? हा माल कुठून आणला होता, याचा शोध घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.