शिवरायांवरील वक्तव्यावरून वाद; चहूबाजूनी जोड्यांचा भडिमार झाल्याने बागेश्वर बाबांची जाहीर माफी
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात निर्माण झालेल्या तीव्र वादानंतर बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी अखेर जाहीर माफी मागितली आहे. “माझ्या विधानामुळे शिवप्रेमींसह कोणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर मी नम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूरमध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी आपल्या प्रवचनात, शिवाजी महाराज सततच्या लढायांमुळे थकले होते आणि त्यांनी राज्यकारभाराची जबाबदारी समर्थ रामदास स्वामींकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा उल्लेख केला होता. या वक्तव्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती.
विशेष म्हणजे, हे विधान करण्यात आले त्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवप्रेमींकडून ठिकठिकाणी तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
वाढता विरोध लक्षात घेता धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात त्यांच्या गुरूंप्रती किती आदरभाव होता, हे दाखवण्यासाठीच आपण आपल्या शैलीत उदाहरण दिले होते. “काही लोकांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला. माझ्यावर विनाकारण आरोप करण्यात आले,” असेही त्यांनी म्हटले.
या संपूर्ण वादासाठी त्यांनी प्रसारमाध्यमांनाही जबाबदार धरले. आपले विधान जाणीवपूर्वक विपर्यस्त करून दाखवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. “आम्ही शिवाजी महाराजांसाठी जगतो आणि वेळ आली तर त्यांच्यासाठी प्राणही देऊ,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नागपूरमध्ये २६ एप्रिलपासून पाच दिवसांच्या रामकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या व्यासपीठावरून समाजात हिंदुत्व जागृत करण्याचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, राज्यात वाढत असलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या घटनांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
हिंदू मुलींनी अधिक सजग राहावे, तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर चांगले काम करत असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारचेही कौतुक केले.