पनवेलच्या आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे बनावट इंजेक्शन रॅकेटचा ‘मास्टरमाइंड’; राज्यभर कोट्यवधींची विक्री उघड

पनवेलच्या आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे बनावट इंजेक्शन रॅकेटचा ‘मास्टरमाइंड’; राज्यभर कोट्यवधींची विक्री उघड

पोलीस महानगर नेटवर्क 

नागपूर : राज्यात मागील दीड ते दोन वर्षांत कोट्यवधी रुपयांच्या बनावट इंजेक्शन्सची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पनवेल-कामोठे येथील आरआरटी फार्माचा मालक रितेश ठोंबरे हा या रॅकेटमधील महाराष्ट्रातील प्रमुख दुवा असल्याचे तपासात उघड झाले आहे. ठोंबरेने पुणे व परिसरातही बनावट औषधांच्या विक्रीचे जाळे उभे केले होते. याप्रकरणी त्याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरच्या तुलसीनगर येथील हितांशी फार्मास्युटिकल्समध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला बनावट औषधांचा मोठा साठा आढळून आला होता. आरोपी रिलायन्स लाइफ केअरच्या नावाखाली ‘ॲलब्युरेल’ या इंजेक्शनचा बनावट साठा चंदीगड येथील राजू मिश्रा याच्या ग्लास्को फार्मास्युटिकल्समध्ये तयार करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

हा बनावट साठा बाहेरील राज्यांतील वितरकांच्या माध्यमातून रितेश ठोंबरेकडे पोहोचत होता. चंदीगडमधील कंपनी वगळता इतर ठिकाणी खोटी बिले दाखवून व्यवहार केले जात होते. दिल्लीतील औषध दलाल दानीश खान याचीही या साखळीत महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे.

नागपूर प्रकरणातील चौकशीत मार्चअखेर ठोंबरेचा सहभाग स्पष्ट झाला. बनावट ॲलब्युरेलचा साठा कुठून आला, याबाबत अन्न व औषध विभागाने त्याची चौकशी केली असता, त्याने व्यवसाय बंद केल्याचे सांगत हात वर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, रितेश ठोंबरे व दानीश खान या दोघांविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल आहे. त्यांनी पुण्यातील श्रीराम हेल्थ केअरचे मालक श्रीराम नंदकिशोर चांडक, सदाशिव पेठेतील आरएसएलचे मालक राजेश शांताराम जोग, त्यांचा भागीदार मुंबईतील वरळी बीडीडी चाळ येथील श्रीशैलम राजय्या गटला आणि प्रिझेम ट्रेडर्स यांच्यासोबत संगनमत करून बनावट ॲलब्युरेलची विक्री केल्याचा आरोप आहे.

११ जुलै ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत या टोळीने चांडक व जोग यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बनावट इंजेक्शन्स ग्राहकांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुण्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त कार्यालयातील औषध निरीक्षक श्रुतिका जाधव यांच्या तक्रारीवरून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी ठोंबरेविरोधात थेट कारवाई झाली नव्हती.

आता नागपूर आणि पुणे या दोन्ही प्रकरणांतील धागेदोरे समोर आल्यानंतर ठोंबरेची भूमिका अधिक संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, राज्यातील बनावट औषधांच्या मोठ्या रॅकेटचा तो ‘मास्टरमाइंड’ असल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon