भारतीय रिझर्व बँकेची सर्वात मोठी कारवाई! पेटीएम पेमेंट्स बैंक चा परवाना रद्द; सर्व व्यवहार बंद
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बँकिंग क्षेत्रात खळबळ माजवणारी घडामोड घडली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा परवाना भारतीय रिझर्व बॅंक ने रद्द केला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 22(4) अंतर्गत असलेल्या अधिकारांनुसार भारतीय रिझर्व बॅंक ने पेटीएम वर ही कारवाई केली आहे.
आरबीआयने पेटीएमच्या बँकिंग प्लॅटफॉर्म, पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द केल्याने खळबळ उडाली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज सार्वजनिक हिताला आणि ठेवीदारांच्या हिताला हानी पोहचवणारे आहे. पीपीबीएलच्या कामकाजामुळे ठेवीदारांना नुकसान होऊ शकले असते. पेटीएम बँक आपल्या परवान्याच्या अटींचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्याने परवाना रद्द करण्यात येत असल्याचे RBI ने परिपत्रकात नमूद केले आहे.
पीपीबीएल बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 22(3) च्या विविध तरतुदींचे पालन करत नव्हती. आरबीआय आता बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार आहे. यापूर्वी ११ मार्च २०२२ पर्यंत बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई करण्यात आली होती. २०२४ च्या सुरुवातीपर्यंत ठेवी आणि कर्जावरही अनेक निर्बंध लादण्यात आले होते. २४ एप्रिल, २०२६ रोजीच्या आदेशानुसार कामकाजाचा दिवस संपल्यापासून रद्द करण्यात आला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक तिच्या परवान्यात नमूद केलेल्या अटी व शर्तींचे पालन करण्यात अयशस्वी ठरली आहे यामुळे परवाना रद्द करण्यात आला.
पेटीएम पेमेंट्स बैंक चा परवाना रद्द झाल्याने ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे. आपल्या पैशांचे, गुंतवणुकीचे काय होणार असा प्रश्न हजारो ग्राहकांना पडला आहे. जर तुमचे पैसे पेटीएम पेमेंट्स बँकेत जमा असतील, तर घाबरण्याची गरज नाही. आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकात ठेवीदारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडकडे तिची संपूर्ण ठेव देयता पूर्ण करण्यासाठी पुरेशी तरलता आहे. याचा अर्थ असा की, बँक बंद करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी बँकेकडे पुरेसा निधी आहे.
पीपीबीएल २४ एप्रिल २०२६ च्या संध्याकाळपासून आपले सर्व बँकिंग व्यवसाय व्यवहार बंद करेल. बँकेचा परवाना आता रद्द करण्यात आला असून, बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने, ठेवीदारांनी परतावा आणि खाते सेटलमेंटसंबंधी अधिकृत माहितीसाठी आरबीआय आणि बँकेच्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.