स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर मामा” याला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक; सोलापूर पोलीसांनी पुण्यातून घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – स्वतःला बाळूमामाचा अवतार असल्याचा दावा करणारा स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ “मनोहर मामा” याला सोलापूर ग्रामीण पोलीस यांनी पुण्यातील मांजरी परिसरातून ताब्यात घेतले आहे. फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार तसेच महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापेमारी करत मनोहर मामाला अटक केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मनोहर मामा याच्यावर भक्तांकडून पैसे उकळणे, चमत्कारांच्या नावाखाली फसवणूक करणे आणि महिलांचे शोषण केल्याचे आरोप आहेत. “खिशातील नोटांचे अचूक नंबर सांगणारा बाबा” म्हणून त्याची ओळख तयार झाली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक त्याच्या दरबारात जात होते.धक्कादायक बाब म्हणजे विविध राजकीय पक्षांतील काही नेते, सनदी अधिकारी देखील त्याच्या दरबारात हजेरी लावत असल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रकरणांमध्ये मोठ्या पदांसाठी किंवा राजकीय फायद्यासाठी त्याचा सल्ला घेतला जात असल्याचेही सांगितले जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या बांधकामामध्ये करोडोची माया कमावलेला एक सेवानिवृत्त सनदी अधिकारी नांदेड लोकसभा निवडणुकीत खासदारकीचे तिकीट मिळावं म्हणून हेलिकॉप्टरने या बाबाच्या दरबारात हजेरी लावली होती.या कारवाईनंतर अशा स्वयंघोषित बाबांवर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता या प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.