सिमेंटच्या गोण्यांखाली १.४५ कोटींचा परराज्यातील मद्यसाठा; नवी मुंबईत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई : सिमेंटच्या गोण्यांच्या आड लपवून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दहा चाकी ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ४५ लाख २३ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला खात्रीलायक गुप्त बातमीदारामार्फत गोवा राज्यात निर्मित व मध्यप्रदेश राज्यात विक्रीसाठी बनवलेले विदेशी मद्य नवी मुंबईमार्गे वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवार, २४ एप्रिल रोजी बेलापूर-ठाणे रोडवरील डी. वाय. पाटील स्टेडियमजवळ भरारी पथक क्र. १, ठाणे-१ यांनी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता गस्तीदरम्यान टाटा कंपनीचा (२५१८सी) चॉकलेटी रंगाचा दहा चाकी ट्रक (क्र. GJ-09-AV-9975) संशयावरून थांबवून तपासणी केली.
वाहनात ‘वंडर सिमेंट’च्या गोण्या भरलेल्या आढळल्या. मात्र त्या बाजूला करून पाहणी केली असता खाली खास बनवलेल्या कप्प्यात पुठ्ठ्याचे बॉक्स लपवून ठेवलेले दिसून आले. हे बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये ‘रॉयल सिलेक्ट डिलक्स व्हिस्की’च्या १८० मिलीच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या.
या कारवाईत एकूण १२६५ बॉक्स (१०,९२९ बल्क लिटर) परराज्यातील मद्य जप्त करण्यात आले. त्यासोबतच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ४५ लाख २३ हजार ९५० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ९०/२०२६ नोंद करण्यात आला असून दिनेश कैलास नाथ (वाहनचालक) आणि अनिल कुमार श्यामलाल नायक या दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक प्रविण तांबे, प्र. उपअधीक्षक आनंद पवार आणि उपअधीक्षक रत्नमाला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. पी. धनशेट्टी यांच्या पथकाने केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक महेश प्रकाश धनशेट्टी करीत आहेत.