आरटीओ चलान भरण्याच्या बहाण्याने मोबाईल हॅक; ठाण्यात वृद्धाची २० लाखांची फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : वाहनावरील आरटीओ चलानाचा दंड प्रलंबित असल्याचा बनावट संदेश पाठवून सायबर गुन्हेगारांनी एका वृद्धाचा मोबाईल हॅक करत तब्बल २० लाख १६ हजार २१ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजिवडा परिसरात राहणाऱ्या ६१ वर्षीय व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाशी त्यांचे बँक खाते जोडलेले आहे. २१ मार्च रोजी त्यांच्या व्हॉट्सॲपवर ‘आरटीओ चलानाचा दंड बाकी असून तो तातडीने भरा’ असा संदेश आला होता. या संदेशासोबत दंड भरण्यासाठी ‘एपीके’ फाईलही पाठवण्यात आली होती.
सदर फाईलवर क्लिक करण्याच्या सूचनेनुसार संबंधित वृद्धाने ती उघडताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्यातून १३ एप्रिल रोजी १९ लाख ९९ हजार २१ रुपये, तर १४ एप्रिल रोजी १७ हजार रुपये अशी एकूण २० लाख १६ हजार २१ रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढून घेतली.
घडलेला प्रकार लक्षात येताच संबंधितांनी बँकेत धाव घेत तक्रार नोंदवली. तसेच सायबर फसवणुकीची ऑनलाईन तक्रारही दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अंतर्गत कलम ६६ (क) आणि ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, एपीके फाईलद्वारे होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अशा अनोळखी लिंक किंवा फाईलवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.