पुणे महापालिकेत ‘टक्केवारी’वरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांत वाद; शिवीगाळीचा व्हिडीओ व्हायरल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये विकासकामाच्या ‘टक्केवारी’वरून तुंबळ वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिका मुख्यालयातच दोन्ही नगरसेविकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याचे व्हिडिओत दिसत आहे. उपस्थितांपैकी काहींनी या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले असून, तो व्हिडीओ सध्या वेगाने प्रसारित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थिनींसाठीच्या निवासी शिक्षण केंद्राच्या उभारणीच्या कामाशी संबंधित ‘कमिशन’च्या वाटपावरून हा वाद उद्भवला. या मुद्द्यावरून निर्माण झालेला मतभेद थेट महापालिका इमारतीत उफाळून आला.
समाजोपयोगी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातीलच दोन गटांमध्ये उघडपणे असा वाद झाल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विकासकामांपेक्षा ‘टक्केवारी’ला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, लोकप्रतिनिधींनी जबाबदारीचे भान राखावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.