एल्फिन्स्टन पूल जमीनदोस्त; रेल्वे सेवा सुरळीत, २०२७ पर्यंत नवा डबल-डेकर पूल
सुधाकर नाडार / प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील महत्त्वाचा दुवा ठरलेला एल्फिन्स्टन पूल पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला असून उपनगरीय रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत सुरू झाल्या आहेत. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार रविवारी गाड्या नियमित वेळापत्रकानुसार धावत असून प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पूल हटविल्यानंतर आता नव्या डबल-डेकर पुलाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, पूर्व-पश्चिम दळणवळण अधिक सक्षम करण्यास त्याचा मोठा हातभार लागणार आहे. तसेच पश्चिम उपनगरांना प्रमुख मार्गांशी अधिक सुलभ जोडणी मिळणार आहे.
सुमारे ११२ वर्षे जुना असलेला हा पूल परळ आणि प्रभादेवी परिसरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग होता. मात्र वाढता वाहतूक ताण आणि संरचनात्मक कमजोरी लक्षात घेऊन तो पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या कामासाठी २ ते ५ एप्रिल दरम्यान रात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. या काळात काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. पुलाच्या पाडकामाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर ‘मिशन एल्फिन्स्टन’ यशस्वी झाल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.