साडी वाटपाच्या आमिषाने महिलांची फसवणूक; साकीनाका पोलिसांकडून टोळी जेरबंद, १३ गुन्ह्यांचा उलगडा
सुधाकर नाडार / प्रतिनिधी
मुंबई : साडी वाटप व रेशन देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा साकीनाका पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईत मुंबई व नवी मुंबईतील एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे १६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
२४ मार्च २०२६ रोजी दुपारी साकीनाका येथील मोहीली व्हिलेज पाईपलाईन परिसरातील साईबाबा मंदिराजवळ ही घटना घडली. फिर्यादी महिला घरी जात असताना तीन अज्ञात इसमांनी तिला गाठले. “शेठला मुलगा झाला असून गरीब महिलांना साडी वाटप सुरू आहे,” असे सांगत त्यांनी तिचा विश्वास संपादन केला. तसेच “गरीब दिसण्यासाठी गळ्यातील दागिने काढून पिशवीत ठेवा,” असा सल्ला देत त्यांनी फिर्यादीकडील सुमारे २.०५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम फसवणुकीने लंपास केली.
या प्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०९/२०२६ नोंदवण्यात आला होता. तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नागरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. आरोपी संतोष चौरे याला डोंबिवली पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे बालाजी पवार व लक्ष्मण पवार यांना शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली.
अटक आरोपींकडून १२३.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत १६ लाख रुपये आहे. या टोळीने मुंबई व नवी मुंबई परिसरात अशाच प्रकारे अनेक महिलांना फसविल्याचे समोर आले असून आतापर्यंत १३ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
ही कारवाई साकीनाका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पुढील तपास सुरू आहे.