संभाजीनगरमध्ये हर्सुल तलावात पोहायला गेलेल्या ४ तरुणांचा बुडून
मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – सध्या उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत असून उन्हाळ्यातील सुट्टीत पोहण्याचा आनंद घेण्याचा वेगळाच छंद असतो. त्यामुळे, विहिर, तलाव किंवा नदी पात्रात पोहण्यासाठी तरुणाईसह वडीलधारीही पुढे असतात. मात्र, छ. संभाजीनगर शहरालगत असलेल्या हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान, मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून इतर दोघांची ओळख पटविण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.
हर्सुल तलावात तरुण मुले बुडाल्याची आणि सुरुवातीला तीन तरुण तलावात बुडाल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. त्यानुसार, अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाच्या मदतीने बचावकार्य करत तिघांचे मृतदेह तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, तलावाच्या दुसऱ्या बाजूला आणखी एक तरुण बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाने तेथेही शोधमोहीम राबवली असता चौथ्या तरुणाचाही मृतदेह पाण्यात आढळून आला.
रविवारची सुट्टी असल्याने हे सर्व तरुण तलावात पोहण्यासाठी गेले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र , हा रविवार त्यांच्या आयुष्यात शेवटचा ठरल्याची दु:खद घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतांपैकी अफान खान आणि आदिल शेख अशी दोघांची नावे समोर आली असून उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तलावात बुडालेल्या चौघांचेगी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.