रस्त्यात अडवून तरुणीवर सामूहिक अत्याचार; अमरावतीतील संतापजनक घटना, पाच आरोपींना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील चांदुर रेल्वे रोडवरील भानखेडा फाटा परिसरात १९ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी रात्री ८ ते साडेनऊच्या सुमारास पीडित तरुणी आपल्या मित्रासह भानखेडा फाटा परिसरातून जात होती. यावेळी पाच आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी तरुणीच्या मित्राला मारहाण करून दोरखंडाने त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर आरोपींनी आळीपाळीने तरुणीवर अत्याचार केला.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याच रात्री पाचही आरोपींना अटक केली. मात्र तपासाच्या कारणास्तव आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. यामुळे नागरिक आणि विविध संघटनांमध्ये संताप व्यक्त होत होता. अखेर आठ दिवसांनंतर पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे (३४), दीपक मरसकोल्हे (२९), प्रमोद नारायण वाघाडे (३९), शुभम उर्फ सोनू नारायण वाघाडे (२८) आणि उमेश बेनीराम भोयर यांचा समावेश आहे. शनिवारी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले.
दरम्यान, या अमानवीय घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना आणि नागरिक आक्रमक झाले असून, प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.