ढोंगी बाबाचा काळा पैसा उघड; मुलाच्या कबुलीजबाबाने तपासाला वेग

Spread the love

ढोंगी बाबाचा काळा पैसा उघड; मुलाच्या कबुलीजबाबाने तपासाला वेग

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक : आध्यात्मिकतेच्या आडून महिलांचे शोषण आणि भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीत खरातच्या मुलाने दिलेल्या कबुलीजबाबामुळे या कथित काळ्या साम्राज्याचे धागेदोरे उलगडू लागले आहेत.

एसआयटीकडून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आल्यानंतर मुलाने घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम येत असल्याचे सांगितले. “घरात नोटांची बंडलं यायची आणि त्या व्यवहारावर पूर्ण नियंत्रण वडिलांचेच होते,” असे त्याने नमूद केले. पैशांचा स्रोत काय, याची माहिती नसली तरी प्रत्येक व्यवहार त्यांच्या आदेशानुसार होत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी प्रकरणात हवाला रॅकेटचा संशय व्यक्त केला असून, भाविकांकडून उकळलेला पैसा पांढरा करण्यासाठी विविध आर्थिक मार्गांचा वापर करण्यात आल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे. ईशान्येश्वर मंदिराशी संबंधित शिवनिका संस्थेच्या संचालकांचीही चौकशी करण्यात आली असून, आर्थिक अनियमिततेचे संकेत मिळाले आहेत.

तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, खरात लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत “देवाचा कोप” किंवा “संकट” यांची भीती दाखवून विशेष पूजा-अर्चांच्या नावाखाली मोठ्या रकमांची उकळपट्टी करत होता. याच माध्यमातून काही महिला भाविकांचे लैंगिक शोषण झाल्याचेही आरोप आहेत.

दरम्यान, एसआयटीने खरातच्या बँक खात्यांसह बेनामी मालमत्ता आणि गुंतवणुकींचा तपास सुरू केला आहे. शिवनिका संस्थेचे सविस्तर आर्थिक लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याची तयारीही सुरू असून, या प्रकरणात आणखी काही प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon