मतदार पडताळणीसाठी गेलेल्या बीएलओवर हल्ला; रिसोडमध्ये तीन अज्ञातांकडून मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या मतदार पडताळणी मोहिमेदरम्यान रिसोड शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रत्यक्ष पडताळणी (मॅपिंग) कामासाठी गेलेल्या बीएलओ कर्मचाऱ्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ मुंढे हे बीएलओ कर्मचारी २००२ व २०२४ च्या मतदार याद्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी रिसोड शहरात गेले होते. यावेळी अचानक तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मुंढे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या घटनेनंतर मतदार पडताळणीच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे होत आहे.
पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.