आयपीओ गुंतवणुकीच्या आमिषाने ₹२.९३ कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश, नवी मुंबईतून तिघांना अटक

Spread the love

आयपीओ गुंतवणुकीच्या आमिषाने ₹२.९३ कोटींची फसवणूक; आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा पर्दाफाश, नवी मुंबईतून तिघांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

पिंपरी-चिंचवड : शेअर बाजारातील आयपीओ गुंतवणुकीत अल्पावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ₹२ कोटी ९३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आंतरराज्यीय तसेच आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश केला असून नवी मुंबईतून तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी काही व्यवहार यशस्वी दाखवण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमा गुंतवायला भाग पाडत आरोपींनी ₹२.९३ कोटी उकळले. मात्र, कोणताही परतावा न मिळाल्याने आणि आरोपी संपर्काबाहेर गेल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, आरोपींनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मधील खात्यात ₹१.२५ लाखांची रक्कम वळती केल्याचे आढळले. हे खाते ‘अरशील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने उघडण्यात आले होते.

तपासाच्या धागेदोऱ्यांवरून पोलिसांनी नवी मुंबई गाठत तुर्भे परिसरातून सुशील भगवान जुवाटकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज राज कपूर आणि निश्चल टंकबीर बरेयली यांनाही अटक करण्यात आली. तपासात पुढे उघड झाले की, दोघे आरोपी यापूर्वी बँकॉक आणि म्यानमार येथे सायबर फसवणुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या कॉल सेंटरमध्ये कार्यरत होते आणि भारतात परतल्यानंतर नवी मुंबईत तत्सम कॉल सेंटर सुरू करण्याच्या तयारीत होते.

या टोळीची कार्यपद्धती अत्यंत संगठित होती. बनावट कंपन्यांच्या नावाने बँक खाती उघडणे, विविध बँकांचे अकाउंट ओपनिंग किट तयार ठेवणे, क्यूआर कोड आणि पीओएस मशीनद्वारे पैसे गोळा करणे, तसेच वेगवेगळ्या ओळखींचा वापर करून नागरिकांची दिशाभूल करणे, अशा पद्धतीने फसवणूक केली जात होती.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ६ मोबाईल फोन, ३ पासपोर्ट, ३ पीओएस मशीन, २ लॅपटॉप, २ हार्डडिस्क, २ क्यू आर कोड स्कॅनर, १२ बनावट शिक्के, २४ विविध बँकांचे अकाउंट ओपनिंग किट आणि ५ डेबिट कार्ड असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा भांडाफोड झाला असून, आणखी किती जणांना गंडा घातला गेला आहे याचा तपास सुरू आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon