३ कोटींचे सोनं व १७.५० लाखांची रोकड जप्त; सराफांची फसवणूक करणारा आरोपी ठाणे गुन्हे शाखेकडून अटकेत

Spread the love

३ कोटींचे सोनं व १७.५० लाखांची रोकड जप्त; सराफांची फसवणूक करणारा आरोपी ठाणे गुन्हे शाखेकडून अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : सराफी व्यापाऱ्यांना उच्च दर्जाच्या सोन्याचा व्यवहार करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला ठाणे शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ३ कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या लगड्या तसेच १७ लाख ५० हजार रुपयांची रोकड असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मधील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे व भिवंडी परिसरातील सराफी व्यापाऱ्यांना शुद्ध सोन्याचा मोठा व्यवहार करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यामध्ये चांगला नफा मिळेल असे सांगून संबंधित व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात ऑक्टोबर २०२५ मध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा घटक-१ कडून सुरू असताना आरोपी सतत आपले ठिकाण बदलत विविध राज्यांत फिरत असल्याने पोलिसांना चकवा देत होता. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी घोडबंदर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे व त्यांच्या पथकाने २३ मार्च २०२६ रोजी रात्री आरोपीला अटक केली. पुढील तपासादरम्यान आरोपीकडून ठाणे तसेच राजस्थानातील पाली जिल्ह्यातून सोन्याच्या लगड्या व रोकड जप्त करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे १,२१५.७९ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाच लगड्या (किंमत अंदाजे १.३९ कोटी रुपये), ७४२ ग्रॅम वजनाच्या दोन लगड्या (किंमत सुमारे ९० लाख रुपये) तसेच १७.५० लाख रुपयांची रोकड यांचा समावेश आहे.

अटक आरोपी जीवाराम वर्धाजी चौधरी (वय ४६) हा मूळ राजस्थानातील असून सध्या ठाण्यात वास्तव्यास होता. त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon