नांदेड जिल्हा सत्र न्यायालयात ‘ईद मिलाप’ उत्साहात
रवि निषाद / वार्ताहर
नांदेड : नांदेड जिल्हा सत्र न्यायालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ईद मिलाप’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुस्लिम अॅडव्होकेट फोरम, नांदेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाची माहिती प्रमुख वकील अॅड. नाझ शेख यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहकारी वकिलांच्या सहभागातून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. अॅड. एम. झेड. सिद्दीखी आणि अॅड. सय्यद अरीबोद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमास जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश, वकील तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ईदच्या निमित्ताने परस्परांतील सौहार्द वाढविणे आणि एकात्मतेचा संदेश देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे न्यायालय परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले असून, उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत ईद साजरी केली.