लाईट ड्युटीसाठी १५ हजारांची लाच मागणी; काशिमीरा वाहतूक विभागातील निरीक्षकासह हवालदारावर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत काशिमीरा वाहतूक विभागात ‘लाईट ड्युटी’ देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि पोलीस हवालदार मनोज गोल्हार यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे याच विभागात कार्यरत असून त्यांना प्रकृतीअभावी हलकी ड्युटी देण्याची गरज होती. ही ड्युटी लावून देण्यासाठी निरीक्षक इंगोले यांनी १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. त्यांच्या सूचनेनुसार हवालदार गोल्हार यांनी तक्रारदाराकडे पैशांचा तगादा लावला.
तपासात असे निष्पन्न झाले की, एकूण २० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यात निरीक्षकांसाठी १५ हजार रुपये, हवालदारासाठी २,५०० रुपये आणि ‘रायटर’ म्हणून कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासाठी २,५०० रुपये अशी मागणी करण्यात आली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत ५ सप्टेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर ५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत एसीबीने पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.
याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ३० मार्च २०२६ रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा (गु.र.क्र. १२७/२०२६) नोंदवण्यात आला आहे. या कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण आणि अपर पोलीस उपआयुक्त अनिल घेरडीकर यांनी केले.
या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.