लॉकअपमध्येच अमानुष मागणी; “१० हजार देतो, मुलगी एक रात्र पाठव” – अकोल्यात एएसआयवर गंभीर आरोप

Spread the love

लॉकअपमध्येच अमानुष मागणी; “१० हजार देतो, मुलगी एक रात्र पाठव” – अकोल्यात एएसआयवर गंभीर आरोप

पोलीस महानगर नेटवर्क

अकोला : पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारी संतापजनक घटना अकोला शहरात उघडकीस आली आहे. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये तैनात असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाने (ASI) एका महिला आरोपीकडे तिच्या मुलीला एक रात्र पाठवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका महिलेला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी ड्युटीवर असलेल्या एएसआय राजेश जाधव यांनी संबंधित महिलेकडे तिच्या मुलीच्या वयाबाबत चौकशी केली. त्यानंतर “तुझ्या मुलीला १० हजार रुपये देतो, तिला एक रात्र माझ्याकडे पाठव,” अशी अश्लील व अमानुष मागणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जुमळे घटनास्थळी दाखल झाले. पीडित महिलेने रडत संपूर्ण प्रकार कथन केल्यानंतर जुमळे यांनी संताप व्यक्त करत संबंधित एएसआयला जाब विचारला. “वर्दी घालून असे कृत्य करताना लाज कशी वाटली नाही?” अशा शब्दांत त्यांनी त्याला फटकारले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, आरोपी एएसआयने आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला असला, तरी पीडित महिलेने ठामपणे आपला आरोप कायम ठेवला आहे. या प्रकारामुळे पोलीस ठाण्यातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, संबंधित एएसआयवर निलंबनाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon