कोकण विभागाला पहिली महिला आयुक्त; रुबल अग्रवाल यांच्याकडे सूत्रे
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : प्रशासकीय क्षेत्रातील धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी ३० मार्च रोजी कोकण विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रभारी आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारताच विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
२००८ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करत आपल्या कारकिर्दीत ठसा उमटवला आहे. सोलापूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदासह अहमदनगर आणि जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या.
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असताना कोविड-१९ संकट व्यवस्थापनात त्यांनी प्रभावी भूमिका बजावली होती.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या (ICDS) आयुक्त म्हणून राज्यातील सुमारे १.१० लाख अंगणवाड्यांचे जाळे सक्षमपणे हाताळण्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्तीपूर्वी त्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या.
अग्रवाल यांच्या कार्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार (२०१६-१७), महात्मा गांधी शांतता पुरस्कार, अरुण बोंगीरवार सार्वजनिक सेवा उत्कृष्टता पुरस्कार तसेच स्मार्ट सिटी डिजिटल पेमेंट आणि ई-गव्हर्नन्स पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
भौगोलिक व प्रशासकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कोकण विभागात महसूल प्रशासन, पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांत त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट केले.