कल्याण-डोंबिवली महापालिकेत महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सावळाराम क्रीडा संकुलात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला वरिष्ठ लिपिकाने नोकरीवरून काढण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामाच्या कारणावरून संबंधित महिला कर्मचारी आणि वरिष्ठ लिपिक यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आरोपी लिपिकाने पीडित महिलेला व्हॉट्सअॅप कॉल करून तिला नोकरीवरून काढण्याचे आदेश आल्याचे सांगत मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. याच संभाषणादरम्यान “तू मला काय देशील?” असा सवाल करत थेट शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र प्रशासनाकडून तात्काळ कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती. अखेर पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार नोंदवली. पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून नोटीस बजावली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, संबंधित अधिकारी यापूर्वीही वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकलेला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि महिला सुरक्षेबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.