प्रेमसंबंधांच्या वादातून तरुणाची आत्महत्या; मारहाण व छळाचा आरोप, चार जणांवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
बीड : तालुक्यातील मांजरसुंबा परिसरात प्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या वादाने थरारक वळण घेत २३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून, प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर याचे नेकनूरजवळील एका गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी संतप्त होऊन ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतल्याचे सांगितले जाते. तेथे त्याची दुचाकी व मोबाईल काढून घेत चार जणांनी त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करत गावात बदनाम करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर ज्ञानेश्वर मानसिक तणावाखाली होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने, “मला मारहाण करण्यात आली, गावात चोरटा म्हणून बदनाम केले आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या,” असा उल्लेख केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर धुळे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर दुरुस्तीच्या दुकानात त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, मृताच्या आईने गंभीर आरोप करत, मुलाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याचा आणि त्याचे चित्रीकरण करण्यात आल्याचा दावा केला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात वसंत उंदरे, सचिन उंदरे, अशोक उंदरे आणि प्रेम उंदरे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.