‘डिजिटल अटकेत’ ठेवून २.८४ कोटींची फसवणूक; ७७ वर्षीय दाम्पत्य सायबर जाळ्यात

Spread the love

‘डिजिटल अटकेत’ ठेवून २.८४ कोटींची फसवणूक; ७७ वर्षीय दाम्पत्य सायबर जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : ‘दहशतवादी संबंधां’ची भीती दाखवत एका ७७ वर्षीय दाम्पत्याला ‘डिजिटल अटकेत’ ठेऊन तब्बल २.८४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कांजूरमार्ग परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींनी स्वतःला मुंबई पोलीस, एटीएस आणि एनआयएचे अधिकारी असल्याचे भासवून हा घोटाळा केल्याचे समोर आले आहे.

सायबर पोलीस (पूर्व विभाग) यांच्याकडे दाखल तक्रारीनुसार, ही फसवणूक १६ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झाली. पीडितांच्या पत्नीला ‘पोलीस निरीक्षक रणजित कुमार’ असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने फोन करून त्यांच्या आधार कार्डाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचा आरोप केला. लखनौ एटीएस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगत आरोपींनी भीतीचे वातावरण निर्माण केले.

यानंतर ‘प्रेमकुमार गौतम’ आणि ‘अजय श्रीवास्तव’ अशी खोटी ओळख सांगणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला एटीएस अधिकारी म्हणून सादर करत दाम्पत्यावर दबाव वाढवला. त्यांनी राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक सदानंद दाते यांच्या नावाने बनावट ‘गोपनीयता करार’ पाठवला. तसेच, विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नरच्या नावानेही बनावट पत्रे पाठवण्यात आली.

फसवणूक करणाऱ्यांनी दाम्पत्याला ‘सिग्नल’ मेसेजिंग अॅप डाउनलोड करण्यास भाग पाडले आणि त्यांना घरातच राहण्याचे आदेश दिले. या कालावधीत त्यांना दर चार तासांनी ‘आम्ही राष्ट्रीय सुरक्षेसोबत सुरक्षित आहोत’ असा संदेश पाठवण्यास भाग पाडले जात होते. कोणालाही माहिती दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली.

चौकशीच्या नावाखाली आरोपींनी दाम्पत्याला त्यांच्या बँक खात्यातील रक्कम ‘सुरक्षिततेसाठी’ हस्तांतरित करण्यास भाग पाडले. भीतीमुळे दाम्पत्याने आरटीजीएसद्वारे विविध व्यवहार करत एकूण २.८४ कोटी रुपये आरोपींनी दिलेल्या खात्यांमध्ये वर्ग केले.

दरम्यान, सायबर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या धमक्यांना बळी न पडता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon