महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाचा मोठा निर्णय; ऐन उन्हाळ्यात एक एप्रिल पासून मुंबईकरांचे वीज बिल कमी होणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मार्च महिना संपल्यानतंर राज्यात सर्वत्रच कडाक्याचे ऊन पाहायला मिळते. या उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी आपण घरात पंखा, एसी, कुलर अशी उपकरणं दिवसभर वापरतो. परिणामी यामुळे विजेचे बील जास्त येण्याची चिंता सर्वसामान्यांना सतावते. मात्र, आता राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील वीज ग्राहकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून वीज दरात लक्षणीय कपात लागू केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (MERC) याबद्दलचा निर्णय घेतला आहे.
मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट , टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या दरात घट झाली आहे.या निर्णयानुसार वेगवेगळ्या स्तरावरील ग्राहकांना फायदा होईल.
केवळ मुंबईच नव्हे, तर उर्वरित महाराष्ट्रात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या (MSEB) ग्राहकांसाठीही आनंदाची बातमी आहे. आयोगाने मान्य केलेल्या पाच वर्षांच्या (२०२५-२०३०) आराखड्यानुसार, दरवर्षी टप्प्याटप्प्याने वीज दर कमी केले जातील. विशेष म्हणजे, आगामी काळात कोणत्याही प्रवर्गात वीज दर वाढणार नाहीत, असे आश्वासन देण्यात आले आहे.
हे नवीन दर उद्या १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील. त्यामुळे ग्राहकांना मे महिन्यात जे बिल मिळेल, त्यामध्ये या कपातीचा प्रत्यक्ष फायदा दिसून येईल. वाढत्या महागाईच्या काळात वीज दरातील ही घट सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा आधार देणारी ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने १ एप्रिल २०२६ पासून वीज दरात मोठी कपात जाहीर केली आहे. मुंबईतील टाटा, अदानी आणि बेस्टच्या ग्राहकांना नव्या दरपत्रकामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून मे महिन्याच्या बिलात मोठी बचत होईल.