जामखेडमध्ये कॅफेंच्या आड ‘प्रायव्हसी’चा गैरवापर; अनैतिक प्रकारांमुळे नागरिक संतप्त
पोलीस महानगर नेटवर्क
जामखेड : शहरातील काही कॅफे चालकांकडून ‘प्रायव्हसी’च्या नावाखाली तासावर केबिन्स भाड्याने देत अश्लील व अनैतिक कृत्यांना खतपाणी घातले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक संस्था आणि मुख्य रस्त्यांच्या परिसरातच असे प्रकार सुरू असल्याने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या कॅफेंमध्ये बाहेरील आवाज आत जाऊ नये आणि आत सुरू असलेल्या हालचाली बाहेर समजू नयेत यासाठी मोठ्या आवाजात संगीत लावले जाते. तसेच संशयास्पद हालचाली लपवण्यासाठी खास केबिन्सची रचना करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ‘प्रायव्हसी’च्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार प्रत्यक्षात अनैतिक धंद्याला चालना देणारा ठरत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, शहरात रोडरोमिओंकडून मुलींचा छळ वाढल्याच्या घटना समोर येत असून, त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी संबंधित कॅफेंवर कडक कारवाईचे संकेत दिले असून, लवकरच तपास मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.