मीरा-भाईंदरमधील कचऱ्याची गोराईत विल्हेवाट; मुंबई महापालिकेकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मीरा-भाईंदर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट मुंबईतील शेपाळी आणि गोराई गावात टाकला जात असल्याच्या आरोपानंतर महानगरपालिकेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू आहे. दरम्यान, तीन तपासणी नाके ओलांडून मिरा – भाईंदर मधील कचऱ्याचे ट्रक मुंबईत कसे आले, याबाबत स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी गोराईतील काही भागांत रात्री १० नंतर पन्नासहून अधिक डंपरद्वारे कचरा टाकला जात असल्याचा आरोप गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशनकडून करण्यात आला होता. कचऱ्याने भरलेले डंपर काळोख्या रात्री शेपाळी आणि गोराई गावातील विविध ठिकाणी रिकामे करण्यात आले.एमटीडीसी व खासगी जागेवर कचरा टाकण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला. याबाबत त्यांनी महानगरपालिका प्रशासनाने तक्रार दाखल केली. त्यानंतर महापालिकेने या प्रकरणाची माहिती पोलिस ठाण्यात देऊन गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर रविवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला.
सुमारे ८० डंपर भरतील, इतका कचरा शेपाळी आणि गोराईत टाकण्यात आला आहे. हा कचरा मीरा भाईंदर शहारातीलच असून त्याबाबतचे काही पुरावे पोलिसांना देण्यात आले आहेत. दरम्यान, तहसीलदार कार्यालयाकडूनही सोमवारी पंचनामा करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या बेकायदेशीर कृत्यामुळे सार्वजनिक स्वच्छता व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पर्यावरणीय सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच, अनेक दिवसांपासून पडून असलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, जेणेकरून स्थानिकांची दुर्गंधीतून सुटका होईल, अशी मागणी गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे करण्यात आली.
गोराईतील गावांमध्ये टाकण्यात आलेला कचरा मीरा – भाईंदर शहरातीलच आहे की नाही, याबाबत पोलीस तपास करत आहेत. तो मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील असेल, तर हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होईल. याबाबतचा पूर्ण तपास झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल, असे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.