मिरा-भाईंदरमध्ये ‘लोन’च्या आमिषाने जाळ्यात अडकवून खंडणी; महिलेसह टोळीचा डाव उघड
पोलीस महानगर नेटवर्क
मिरा-भाईंदर : बिझनेस लोन देण्याच्या आमिषाने एका ४० वर्षीय व्यक्तीला जाळ्यात ओढून त्याच्यावर मारहाण करत खंडणी वसूल केल्याची धक्कादायक घटना मिरा रोड परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून तिच्या साथीदार असलेल्या तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती बिझनेस लोन पुरवठा करण्याचे काम करत असून त्याची ओळख ‘टिंडर’ या सोशल अॅपद्वारे एका महिलेशी झाली होती. महिलेने स्वतःला लोनची गरज असल्याचे सांगत मिरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात कागदपत्रांच्या निमित्ताने भेटण्यास बोलावले.
ठरल्याप्रमाणे संबंधित व्यक्ती घटनास्थळी पोहोचताच महिलेने त्याला एका घरात नेले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या तीन जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी मारहाण करत दीड लाख रुपयांची मागणी केली आणि धमकावत त्याच्याकडून सुमारे ४५ हजार रुपये उकळून घेतले. त्यानंतर सर्व आरोपी तेथून पसार झाले.
या घटनेची गंभीर दखल घेत नगर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे महिलेचा शोध घेऊन तिला अटक केली. तिच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.