जप्त वाहनांच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक; ठाणे-कल्याणमधील दोन नागरिकांची पोलिसांत तक्रार
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे/कल्याण : बँकांकडून जप्त करण्यात आलेली वाहने कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका कर्जविषयक मध्यस्थाने दोन नागरिकांची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे ठाणे व कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे.
फसवणूक झालेल्यांमध्ये एका नामांकित औषध कंपनीत उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचाही समावेश आहे. आरोपीने बँकेकडून जप्त करण्यात आलेली वाहने लिलावापूर्वीच स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत पीडितांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कागदपत्रांची प्रक्रिया, नोंदणी शुल्क आदी कारणे पुढे करत त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळली.
मात्र, पैसे दिल्यानंतरही वाहन मिळाले नाही. तसेच आरोपीशी संपर्क साधण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पीडितांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बँक जप्त वाहनांच्या खरेदीसंदर्भात नागरिकांनी अधिकृत प्रक्रियेद्वारेच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.