मुंबई लोकलमध्ये दिव्यांगावर सामूहिक हल्ला; दादर–कुर्ला दरम्यान संतापजनक प्रकार

Spread the love

मुंबई लोकलमध्ये दिव्यांगावर सामूहिक हल्ला; दादर–कुर्ला दरम्यान संतापजनक प्रकार

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : शहराच्या ‘लाइफलाइन’ मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेमध्ये दिव्यांग प्रवाशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना रविवारी घडली. सीएसएमटी–कर्जत फास्ट लोकलच्या अपंग डब्यात ५ ते ६ तरुणांनी एका दिव्यांग व्यक्तीवर बेछूट मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना दादर आणि कुर्ला स्थानकांदरम्यान दुपारच्या सुमारास घडली.

प्राथमिक माहितीनुसार, कोणत्यातरी किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले. संबंधित तरुणांनी डब्यातच दिव्यांग व्यक्तीला लक्ष्य करत मारहाण केली. घटनेदरम्यान अन्य प्रवासी उपस्थित असतानाही कोणीही तत्काळ हस्तक्षेप न केल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी कुर्ला स्थानकावर उतरून पसार झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, रेल्वे सुरक्षेच्या उपाययोजनांवर तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः दिव्यांगांसाठी राखीव डब्यातच अशी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

रेल्वे प्रशासन व जीआरपीकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून, व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी यानिमित्ताने पुन्हा एकदा जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon