खरात प्रकरणाचे पडसाद; रुपाली चाकणकर यांना एसआयटी चौकशीची शक्यता
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या उघडकीनंतर निर्माण झालेल्या वादळाचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत असून माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विशेष तपास पथक चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वीच त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हा आणखी एक धक्का मानला जात आहे.
खरातशी संबंधित ‘शिवनिका’ संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबाबत तपास अधिक व्यापक करण्यात आला असून, संस्थेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्याची तयारी एसआयटी कडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये सदस्य राहिलेल्या चाकणकर यांनाही चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तपास यंत्रणांकडून ‘शिवनिका’ संस्थेच्या आर्थिक देवघेवी, गुंतवणूक व्यवहार आणि निर्णय प्रक्रियेची कागदपत्रे तपासली जात आहेत. संस्थेच्या विविध कालखंडातील निर्णयांची जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने संबंधित पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मुख्य संशयित अशोक खरात याला पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर रविवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
खरात प्रकरणाचे धागेदोरे राजकीय पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नाशिकसह राज्यभर या तपासाबाबत उत्सुकता वाढली आहे. आगामी काळात या चौकशीतून कोणते नवे तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.