एकाच दोरीने पती-पत्नीची आत्महत्या; दोन चिमुकली पोरकी, जळगाव हादरले

Spread the love

एकाच दोरीने पती-पत्नीची आत्महत्या; दोन चिमुकली पोरकी, जळगाव हादरले

पोलीस महानगर नेटवर्क

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे पती-पत्नीने एकाच दोरीच्या साहाय्याने शेतात गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हृदयद्रावक प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोन लहान मुले पोरकी झाली आहेत.

भगवान जाधव आणि आशाबाई जाधव अशी मृत दाम्पत्याची नावे असून, त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवापूर शिवारातील स्वतःच्या शेतातील उंबराच्या झाडाला दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतला. घरापासून अवघ्या ३०० फूट अंतरावर ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, जाधव दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शिक्षणासाठी बाहेरगावी होते. आई-वडिलांच्या निधनाची बातमी समजताच मुलांवर व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon