१४० सीसीटीव्हींचा छडा; कोथरूडमधील ‘पाहिजे’ आरोपी ताडीवाला रोडवर जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. विश्वजीत रामचंद्र मोरे (वय २०, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी (गु.र.नं. ७४/२०२६) २७ मार्च रोजी पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. कोथरूड परिसरातील गुन्ह्याशी संबंधित पुणे शहरातील तब्बल ११० ते १४० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. या फुटेजमधून संशयिताची ओळख पटवून त्याचे छायाचित्रे खबऱ्यांना दाखवण्यात आली.
ताडीवाला रोड परिसरातील आर.पी.एफ. डॉग ट्रेनिंग सेंटरजवळ एक तरुण काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलसह थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून विश्वजीत मोरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ओमकार राजेश बनसोडे (वय २३, रा. मांजरी) व अन्य एका साथीदारासह कोथरूडमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली.
दरम्यान, ओमकार बनसोडे हा हिंजवडी पोलीस ठाण्यातील दुसऱ्या एका गुन्ह्यात सध्या कारागृहात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत आरोपीकडून एमएच ४२ एसी ४०७० क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख व त्यांच्या पथकाने केली.