१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमात तीन पोलीस आयुक्तांचा गौरव
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचाही गौरव
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राज्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस आयुक्तांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ठाण्याचे आशुतोष डुंबरे आणि नागपूरचे रविंद्र कुमार सिंगल यांना ‘सर्वोत्तम पोलीस आयुक्त’ म्हणून प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विविध विभागांनी डिजिटल पद्धतींचा अधिक प्रभावी वापर करून सेवा वितरणात गती आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस दलातही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हे तपास, नागरिकांशी संवाद आणि प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि विश्वासार्ह सेवा देण्याचे उद्दिष्ट पुढेही कायम ठेवण्याचे आवाहन केले.