मेकअप रूममध्ये परवानगीशिवाय प्रवेश; गडकरी रंगायतनातील प्रकारावरून संताप
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : गडकरी रंगायतन नाट्यगृहात महिला कलाकारांच्या मेकअप रूममध्ये त्यांच्या परवानगीशिवाय दुरुस्ती कामगारांनी प्रवेश केल्याचा गंभीर आरोप एका नाट्यनिर्मात्याने केला असून, या प्रकारामुळे नाट्यवर्तुळात संताप व्यक्त होत आहे. नाट्यगृह प्रशासनाच्या हलगर्जीपणावरही तीव्र टीका करण्यात येत आहे.
सदर प्रकरणात महिला कलाकारांची गोपनीयता व सुरक्षितता धोक्यात आल्याचे सांगत निर्मात्याने पालिका प्रशासनावर टीकास्त्र सोडले आहे. नाट्यगृहात सुरू असलेल्या दुरुस्ती कामांच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची दखल घेत ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी तातडीने कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार नौपाडा पोलीस ठाण्यात संबंधित कामगार व जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर नाट्यगृहातील सुरक्षा व्यवस्था आणि कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.