‘तंत्र-मंत्र’ आरोपांनी राजकारण ढवळून निघाले; सपकाळांच्या ट्विटनंतर खळबळ
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : राज्याच्या राजकारणात ‘भोंदू बाबा’ प्रकरणामुळे नव्याने वादंग निर्माण झाला असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या ट्विटनंतर आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद घालवण्यासाठी तंत्र-मंत्र आणि अघोरी पूजांचा वापर केल्याचा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला आहे.
सपकाळ यांच्या मते, सत्ताधारी मित्रपक्षांतील काही घटकांनी भोंदू बाबा अशोक खरात यांच्या माध्यमातून अघोरी पूजा करून फडणवीस यांना पदावरून दूर करण्याचा प्रयत्न केला. या घडामोडींनंतरच खरात यांच्याविरोधात कारवाई सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे सत्ताधारी आघाडीत अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.
दरम्यान, २०१८ मध्ये फडणवीस सरकारकडून खरात यांच्या इशानेश्वर मंदिरासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचा मुद्दाही पुढे आला आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचे खरात यांच्याशी संबंध असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.
या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे छायाचित्र समोर आल्याचा दावा करण्यात येत असून, मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही खरात यांच्याशी निकट संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, खरात यांच्या कारवायांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना काही महिन्यांपासून होती; मात्र निकटवर्तीयांच्या संबंधांमुळे कारवाई उशिरा करण्यात आली. आता या प्रकरणाचा राजकीय दबावासाठी वापर होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून होत असून, चौकशी झाल्यास अनेक मंत्री व अधिकारी अडचणीत येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.