ठाण्यात ‘एमडी’ जप्तीची मोठी कारवाई; ४.१२ कोटींचा साठा हस्तगत, तिघांना अटक
सुधाकर नाडार / मुंबई

ठाणे : अंमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेत ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ४ कोटी १२ लाख ४० हजार रुपये किमतीचा ‘एमडी’ (मेफेड्रॉन) जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च रोजी सायंकाळी चरई परिसरातील एमटीएनएल कार्यालयासमोर सापळा रचण्यात आला होता. यावेळी सोहेल खान (२६) आणि रोहित सितापूरे (२१) हे दोघे संशयास्पद हालचाली करताना आढळले. त्यांच्या झडतीत अनुक्रमे १ किलो ५६ ग्रॅम व १ किलो ६ ग्रॅम असा एकूण २ किलो ६२ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान राजेश हडावले (२३) यालाही अटक करण्यात आली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ नेमका कुठून आणण्यात आला व त्याची विक्री कुणाला केली जाणार होती, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव व सहायक पोलीस आयुक्त (प्रतिबंध) रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. नागरिकांनी अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.