डोंबिवलीत पुन्हा घरफोडी; बँक कर्मचाऱ्याच्या घरातून १२.७० लाखांचे दागिने लंपास
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : शहरातील कोपर रेल्वे स्थानक परिसरात घरफोडीच्या घटना पुन्हा वाढत असल्याचे समोर आले असून, समतानगर येथील एका गृहसंकुलात बँक कर्मचाऱ्याच्या घरात चोरट्यांनी सुमारे १२ लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी संबंधित घरात शिरून कपाटातील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. काही दिवसांनंतर कुटुंबीयांनी दागिने वापरण्यासाठी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला असता ही चोरी उघडकीस आली.
या प्रकरणी आकाश नेवसे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात येत आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.