परिमंडळ ६ मध्ये जप्त मालमत्ता परत; दोन कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल तक्रारदारांच्या स्वाधीन
सुधाकर नाडार / यांनी

मुंबई : बृहन्मुंबई पोलिसांकडून परिमंडळ ६ अंतर्गत जप्त करण्यात आलेली चोरी व गहाळ मालमत्ता संबंधित तक्रारदारांना परत देण्याचा उपक्रम मंगळवारी राबविण्यात आला. या उपक्रमात तब्बल २ कोटी १२ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल नागरिकांना परत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या संकल्पनेतून सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम पार पडला. परिमंडळ ६ अंतर्गत चेंबुर, गोवंडी, नेहरूनगर, चुनाभट्टी, ट्रॉम्बे, आर.सी.एफ., मानखुर्द, देवनार, शिवाजीनगर आणि टिळकनगर या १० पोलीस ठाण्यांनी जबरी चोरी, घरफोडी, मोबाईल चोरी आदी गुन्ह्यांमधील मुद्देमाल तपासादरम्यान हस्तगत केला होता.
यामध्ये ट्रॉम्बे पोलीस ठाण्याने सुमारे १० ग्रॅम सोने (१.६० लाख रुपये), चुनाभट्टी पोलीस ठाण्याने स्नॅचिंग प्रकरणातील १२ ग्रॅम मंगळसूत्र (१.८० लाख रुपये) तसेच विविध कंपन्यांचे सुमारे ८०० मोबाईल फोन (२.०८ कोटी रुपये) जप्त केले होते.
हा मुद्देमाल गोवंडी येथे आयोजित कार्यक्रमात अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग, चेंबुर) डॉ. महेश पाटील आणि डीसीपी झोन ६ समीर शेख यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आला.
मालमत्ता परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुंबई पोलिसांचे आभार मानले.