दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – दापोडी येथील मुळा नदीच्या पात्रात मंगळवारी दुपारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मंगळवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नदीपात्रात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाच्या ‘जलपरी’ या विशेष रेस्क्यू वाहनासह जवानांनी अथक प्रयत्नानंतर मृतदेह नदीपात्राबाहेर काढला.
संबंधित महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली की ही घटना काही वेगळी आहे? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून, दापोडी पोलीस परिसरातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी करत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास दापोडी पोलीस करत असून, महिलेची ओळख पटल्यानंतर या प्रकरणातील गुढ उकलण्याची शक्यता आहे.