३०० कोटींच्या जमिनीच्या व्यवहारात ३७.४९ कोटींची फसवणूक; शिंदे गटाच्या शहरप्रमुखासह १० जणांवर गुन्हा

Spread the love

३०० कोटींच्या जमिनीच्या व्यवहारात ३७.४९ कोटींची फसवणूक; शिंदे गटाच्या शहरप्रमुखासह १० जणांवर गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : महंमदवाडी परिसरातील सुमारे ३०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या जमिनीच्या विकास करारात तब्बल ३७ कोटी ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे, सिद्धांत भानगिरे यांच्यासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिक विश्वजित सुभाष झंबर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०११ ते २०२६ या कालावधीत हा फसवणुकीचा कट रचण्यात आला. आरोपींनी महंमदवाडीतील सुमारे २० एकर जमिनीच्या विकासासाठी मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत फिर्यादींकडून २२ कोटी रुपये घेतले. त्यानंतर प्रकल्पासाठी आणखी १५ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तपासादरम्यान, जमिनीचे टायटल क्लिअर न करताच फिर्यादींच्या संमतीशिवाय सर्व्हे क्रमांक १८ मधील १२ गुंठे जमीन परस्पर प्रमोद भानगिरे व इतरांना विकण्यात आल्याचे समोर आले. हा व्यवहार कायदेशीर असल्याचे दाखवण्यासाठी बनावट यूएलसी (ULC) आदेशाचा वापर केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या व्यवहारात गोयल, पटेल आणि ठकवाणी डेव्हलपर्सच्या भागीदारांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, वल्लभ लालजी पटेल यांच्यासह सात जणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. मात्र गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत पोलिसांनी या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon