खळबळजनक ! मध्यरात्री फोनवरून अंबादास दानवे यांना कापून टाकण्याची धमकी; क्रांती चौक पोलिसांत फक्त ‘एनसी’ नोंद
पोलीस महानगर नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तीकडून मध्यरात्री फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी ‘एनसी’ (नॉन-कॉग्निजेबल) नोंदवून तपास सुरू केला आहे.
दानवे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार, ९५९५९५९३०३ या मोबाईल क्रमांकावरून त्यांना ११ मार्चपासून वारंवार फोन येत होते. अपरिचित क्रमांक असल्याने सुरुवातीला त्यांनी फोन उचलला नव्हता. मात्र, १५ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे १.५४ ते २.०० या वेळेत त्याच क्रमांकावरून पुन्हा सलग फोन आल्याने त्यांनी फोन उचलला.
फोन उचलताच समोरून दोन ते तीन व्यक्तींनी अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत ‘कापून टाकू, ठोकून टाकू’ अशा शब्दांत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे दानवे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेनंतर दानवे यांचे स्वीय सहाय्यक गणेश भगवान म्हस्के यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता मधील कलम ३५१ (१) अन्वये ‘एनसी’ नोंदवली असून संबंधित मोबाईल क्रमांकाच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेत्यासारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे धमक्या दिल्याने राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दानवे यांनी पत्रात नमूद केले असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.