गॅस बंद होणार’चा मेसेज पाठवून डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा; लिंकवर क्लिक आणि खातं रिकामं

Spread the love

गॅस बंद होणार’चा मेसेज पाठवून डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा; लिंकवर क्लिक आणि खातं रिकामं

योगेश पांडे / वार्ताहर

डोंबिवली – एकीकडे अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच चिंतेचे वातावरण असताना सायबर भामट्यांनी याच भीतीचा फायदा घेत फसवणुकीचा नवा मार्ग शोधला आहे. डोंबिवलीत ‘महानगर गॅस’चे बिल भरले नसल्याची भीती दाखवून एका नोकरदार महिलेला तब्बल २ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या स्मिता राणे या नोकरदार महिलेला गेल्या आठवड्यात त्यांच्या पतीच्या मोबाईलवर एक एसएमएस प्राप्त झाला. ‘तुम्ही भरलेले महानगर गॅसचे देयक आमच्याकडे दिसत नाही. तातडीने अपडेट न केल्यास तुमचे गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल,’ असा इशारा त्या संदेशात देण्यात आला होता. सध्या गॅस तुटवड्याच्या चर्चेमुळे आधीच चिंता निर्माण झाल्याने स्मिता राणे यांनी घाईघाईत त्या मेसेजमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.

फोनवरील व्यक्तीने स्वतःला महानगर गॅस कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत त्यांना विश्वासात घेतले. तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे बिल सिस्टममध्ये दिसत नसल्याचे सांगून त्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करावी लागेल, असे सांगण्यात आले. बोलता बोलता भामट्याने त्यांना एक लिंक पाठवली. ती लिंक उघडल्यानंतर स्मिता राणे यांनी त्यात डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती भरली.

यानंतर प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे सांगत भामट्याने त्यांना फोनवरच गुंतवून ठेवले. त्याच दरम्यान त्यांच्या क्रेडिट कार्डमधून २ लाख रुपये आणि डेबिट कार्डमधून ९९ हजार ५०० रुपये, असे एकूण २ लाख ९९ हजार ५०० रुपये त्यांच्या खात्यातून काढून घेतले. काही वेळाने बँकेचे व्यवहाराचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे स्मिता राणे यांच्या लक्षात आले.

घडलेल्या प्रकारानंतर त्यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon