अलिबाग जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर मातेला मृत्यू; नवजात बाळ सुरक्षित, कुटुंबीयांत शोककळा
पोलीस महानगर नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर एका ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळ सुरक्षित असले तरी आईच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल विश्वनाथ दुर्गावले (सध्या रा. कुरुळ, ता. अलिबाग; मूळ रा. श्रीवर्धन, जि. रायगड) यांच्या पत्नी विवा विशाल दुर्गावले (वय ३२) या गरोदर असल्याने त्यांना ९ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे पावणे दोनच्या सुमारास अलिबाग जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात दाखल करण्यात आले होते. ११ मार्च रोजी पहाटे सुमारे दोन वाजता त्यांची प्रसूती झाली असून त्यांनी एका बाळाला जन्म दिला. सुरुवातीला प्रसूती प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मात्र, प्रसूतीनंतर काही वेळातच विवा दुर्गावले यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच वैद्यकीय पथकाने नवजात बाळाला स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये हलवून सुरक्षित ठेवले, तर उपचारासाठी मातेला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले; मात्र १२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे पावणे आठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
बाळाच्या जन्मानंतर काही तासांतच आईचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली असून रात्री उशिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणा किंवा प्रसूतीनंतर ४२ दिवसांच्या आत होणाऱ्या मृत्यूची नोंद ‘माता मृत्यू’ म्हणून केली जाते. अशा घटनांमागे अतिरक्तस्राव, संसर्ग, एक्लॅम्पसिया (उच्च रक्तदाब) किंवा ॲनिमिया यांसारखी कारणे असू शकतात. दरम्यान, या घटनेमुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.