मराठी अस्मिता पुन्हा एकदा धोक्यात?

Spread the love

मराठी अस्मिता पुन्हा एकदा धोक्यात?

फिनिक्स मॉलमधील पुस्तक प्रदर्शनात एकही मराठी पुस्तक नसल्याने शिवसैनिक आक्रमक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – लोअर परळ परिसरातील फिनिक्स मॉलमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यावेळी मराठी भाषेच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. मराठी भाषा आणि अस्मितेच्या सुरक्षेसाठी मनसैनिक आणि शिवसैनिक नेहमीच पुढे असतात. आपल्या मायबोलीला न्याय मिळवून देताना कोणतीही कसर सोडत नाहीत. दरम्यान, या पुस्तक प्रदर्शनात मराठी भाषेतील एकही पुस्तक नाही असे समोर आले आहे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. आणि आयोजकांना चांगलाच धडा शिकवला आहे.

मराठी भाषा दिन साजरा होऊन फक्त काहीच दिवस उलटून गेले. मात्र, महिना दिनाचे ऑचित्य साधून गेल्या चार दिवसांपासून फिनिक्स मॉलमध्ये पुस्तर प्रदर्शन भरवण्यात येत आहे. ज्यामध्ये हिंदी, इंग्रजी एवढेच काय तर, फ्रेंच पुस्तकेही आहेत पण एकही मराठी पुस्तक नाही. महाराष्ट्राच्या मुंबईत भरवल्या जाणाऱ्या या पुस्तक प्रदर्शनात एकही मराठी पुस्तक नसल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, लोअर परळच्या स्थानिक नगरसेविका अबोली खाडे आणि शिवसैनिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. मराठी बहुल परिसरात असलेल्या या मॉलमध्ये भरवलेल्या पुस्तक प्रदर्शनात शेकडो परदेशी भाषिक पुस्तके आहेत मात्र, एकही मराठी पुस्तक का नाही? असा जाब आयोजकांना विचारण्यात आला. पण याबाबत आयोजकांकडून स्पष्ट उत्तर मिळाले नाही. तसेच मराठी भाषेतील जुनी पुस्तके विकत घेण्यासही आयोजकांनी नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आक्रमक शिवसैनिकांनी फिनिक्स मॉल येथील पुस्तक प्रदर्शनचे स्टॉल उधळून लावले.

गेल्या काही काळात मराठी भाषा आणि मराठी माणूस याबाबत घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फिनिक्स मॉलमध्ये घडलेली ही घडना अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. विशेष म्हणजे हा मॉल वरळी विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो, ज्याचे प्रतिनिधित्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे करतात. या भागातील नगरसेवकांसह लोकप्रतिनिधीही शिवसेनेशी संबंधित आहेत. त्यामुळे आता मराठी भाषेच्या अस्मितेबाबत भूमिका मांडणारे राजकीय नेतेही या प्रकरणाची दखल घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon