वीटभट्टी मालकाचा अमानुष अत्याचार; कातकरी मजुराचे अपहरण करून झाडाला उलटे टांगले, जखमांवर तिखट चोळले
पालघर / नवीन पाटील
पालघर : कामाच्या उचल पैशांच्या वादातून वीटभट्टीवर काम करणाऱ्या २५ वर्षीय कातकरी आदिवासी मजुराचे अपहरण करून त्याला झाडाला उलटे टांगून जखमांवर तिखट मसाला चोळण्याचा मानवतेला काळिमा फासणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पालघर परिसरात संतापाची लाट उसळली असून केळवा सागरी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष शिनवार भोईर (वय २५, रा. नावझे, ता. पालघर) याचा मोठा भाऊ मदन हा भिवंडी तालुक्यातील पाये येथील वीटभट्टी मालक नंद देवलीकर याच्याकडे कामाला होता. घरखर्चासाठी मदनने मालकाकडून सुमारे ५० हजार रुपयांची उचल घेतली होती. मात्र काही दिवसांपासून तो कामावर हजर राहत नसल्याने संतप्त झालेल्या मालकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, मदनचा ठावठिकाणा लागत नसल्याने नंद देवलीकर हा त्याचा साथीदार घनश्याम याच्यासह पालघर तालुक्यातील जलसार येथे पोहोचला. तेथे मदन न सापडल्याने आरोपींनी त्याचा लहान भाऊ सुभाष भोईर याला जबरदस्तीने गाडीत बसवून ११ मार्च रोजी अपहरण केले. त्यानंतर त्याला भिवंडीतील पाये येथील वीटभट्टीवर नेण्यात आले.
वीटभट्टीवर नेल्यानंतर आरोपींनी मदनचा पत्ता विचारत सुभाषवर अमानुष अत्याचार सुरू केले. धारदार इस्त्राने त्याच्या मानेवर आणि कमरेवर घासून त्याला जखमी करण्यात आले. इतक्यावरच न थांबता आरोपींनी सुभाषचे हात-पाय दोरीने बांधून त्याला वीटभट्टी परिसरातील आंब्याच्या झाडाला पाय वर आणि डोके खाली अशा अवस्थेत उलटे टांगले. त्यानंतर त्याच्या उघड्या जखमांवर तिखट मसाला चोळल्याने तो वेदनेने तडफडत मदतीसाठी ओरडत होता. मात्र मालकाच्या भीतीपोटी कोणीही पुढे आले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
यानंतर आरोपींनी त्याला रात्रभर वीटभट्टीवरील सिमेंटच्या खोलीत डांबून ठेवले. या घटनेनंतर पीडित मजूर आणि त्याच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी श्रमजीवी संघटनेची मदत घेतली. संघटनेच्या पालघर तालुका महिला अध्यक्षा रेखा धांगडे यांच्याकडे त्यांनी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी तातडीने पीडित कुटुंबाला धीर देत पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.
यानंतर संघटनेचे तालुका अध्यक्ष उल्हास पाटील, तालुका सचिव हिना वनगा, उपाध्यक्ष प्रमिला पवार, कामगार जिल्हा सचिव बबल त्रिवेदी, कार्यालयीन सचिव शंकर वरखडे, अॅडव्होकेट राऊत यांच्यासह कार्यकर्ते नयन धांगडे, कविता तुम्बडा, रोशन धांगडे, रुचिता सुतार आदींनी केळवा सागरी पोलीस ठाणे गाठत तीव्र पाठपुरावा केला.
बुधवारी रात्री सुमारे ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या या प्रयत्नांनंतर पोलिसांच्या मदतीने ४८ तासांच्या आत सुभाषची सुटका करण्यात यश आले. या प्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यात वीटभट्टी मालक नंद देवलीकर आणि त्याचा साथीदार घनश्याम (रा. पाये, भिवंडी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १४०(३), ११८(१), १२७(२), ३५१(२), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजया किशन गोस्वामी करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आली आहे. कातकरी मजुरावर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे कामगार आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.